लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी रस्त्यात स्फोटके पेरून जवानांनी भरलेले खासगी वाहन उडवून दिले. या स्फोटात १५ जवान आणि वाहनचालक असे १६ जण शहीद झाले. या स्फोटाची चौकशी एडीजी राजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ते शनिवारी सायंकाळी नागपुरात आले असता निवडक पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्फोट कसा झाला आणि कोणती कारण आहेत, त्याबाबत ओझरती माहिती दिली. छुप्या पद्धतीने घात करणे ही नक्षल्यांची नेहमीचीच पद्धत आहे. मात्र, पोलिसांनी नक्षलभागात काय सतर्कता बाळगावी, त्याचे नियम आहे. छोटीशी चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील शैलेश काळे नामक वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा या स्फोटाला कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे, त्याकडे राजेंद्रसिंग यांचे लक्ष वेधले असता त्याची आम्ही चौकशी करीत असल्याचे ते म्हणाले. काळेचा यापूर्वीही डिफॉल्ट रिपोर्ट पाठविण्यात आला होता, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता संवेदनशील नक्षलभागात त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या वादग्रस्त व्यक्तीसोबतच्या मैत्रीचाही मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता संबंधित सर्वच जणांचे कॉल डिटेल्स काढण्यात येतील, असे ते म्हणाले. या संबंधाने उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तपास सुरू असल्यामुळे बोलणे योग्य होणार नाही, असे म्हटले. येत्या दोन दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.
गडचिरोली स्फोटाची चौकशी अंतिम टप्प्यात : एडीजी (ऑपरेशन) राजेंद्रसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:59 AM
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांनी दिली.
ठळक मुद्देदोन दिवसात अहवाल येणार