लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. या मागणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी विरोध केला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द केली तर शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होईल. कोणताही पुढचा मागचा विचार न करता विद्यापीठांच्या विविध स्तरांतील तळज्ञांसोबत सल्लामसलत न करता अशा प्रकारची केलेली मागणी म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रकार आहे की काय, असा प्रश्न विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता उच्चशिक्षण मंत्र्यांनी केलेली ही मागणी आणखी संभ्रम निर्माण करणारी आहे. कोणत्याही विद्यापीठाने, कोणत्याही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी, कोणत्याही विद्यार्थी संघटनेने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. शासनानेच नेमलेल्या तज्ज्ञ समितीने जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचविले. तरीदेखील अशी मागणी होणे हे एक कोडेच आहे. ग्रेड म्हणजे नेमके काय? त्याचा आधार काय असेल हेदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही. देशातील इतर राज्यांत परीक्षा होणार असून महाराष्ट्रात असे झाले नाही तर भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीदेखील विष्णू चांगदे यांनी व्यक्त केली.विद्यापीठांच्या तयारीचे काय?जुलैमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचविण्यात आले असून राज्यातील सर्वच विद्यापीठे त्याची तयारी करत आहेत. त्यांच्या तयारीवर पाणी फेरण्याचा हा प्रकार आहे. परदेशात किंवा अन्य राज्यात प्रवेश घेताना पुढे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादनदेखील विष्णू चांगदे यांनी केले.
अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये : नागपूर विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 1:08 AM
उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. या मागणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी विरोध केला आहे.
ठळक मुद्दे उच्चशिक्षण मंत्र्यांची मागणी विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीत टाकणारी