यवतमाळ : महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. वीज कंपनीमध्ये ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाढत्या वयोमानामुळे या कर्मचाऱ्यांना विद्युत पोलवर चढणे शक्य नाही. कर्तव्य म्हणून असा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागले. या कर्मचाऱ्यांची उपयोगिता कमी झाल्याचे पाहून एमएसईबी वर्कर्स फेडरेशनसह संघटनांनी त्यांच्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याची मागणी केली होती. अखेर ही योजना मान्य करण्यात आली आहे. ४५ वर्षापेक्षा अधिक वय, २५ वर्षाची सेवा पूर्ण आणि सेवानिवृत्तीला दोन वर्ष शिल्ल्लक असणे हे प्रमुख तीन निकष स्वेच्छानिवृत्तीसाठी ठेवण्यात आले आहे. ११ आॅगस्ट २०१४ पासून ३० आॅगस्ट २०१४ पर्यंत स्वेच्छानिवृत्तीचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज ‘प्रकाशगड’कडे पाठवायचे आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाल्य आयटीआय, इलेक्ट्रिशियन, वायरमनचे शिक्षण घेतलेले असतील तरच ते पात्र राहणार आहेत. त्यांना सुरुवातीला तीन वर्षांपासून वीज सहायक म्हणून कंत्राटी पदावर नेमले जाणार असून त्यानंतर कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कायम ठेवले जाईल. पदवीधर असलेल्या पाल्यांना कनिष्ठ सहायक म्हणून नेमणूक दिली जाईल. त्याकरिता खुल्या प्रवर्गासाठी २७ वर्ष आणि मागासप्रवर्गासाठी ३२ वर्ष ही वयोमर्यादा राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वीज कर्मचाऱ्यांसाठी अखेर स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर
By admin | Published: August 05, 2014 12:59 AM