नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने अखेर आपले पत्ते उघड केले आहेत. काही आमदार व पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानादेखील भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनाच पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रपातळीवरूनच उमेदवारांच्या यादीत गाणार यांचे नाव घोषित करण्यात आले. गाणार यांच्यावर भाजपने तिसऱ्यांचा विश्वास दाखविला आहे. गाणार गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.
गाणार यांची कार्यशैली लक्षात घेता अनेकांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. यावेळी गाणार यांच्याऐवजी शिक्षक आघाडीतील एखादा उमेदवार उभा करावा, असा अनेकांचा सूर होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चाचपणीदेखील केली होती. गाणार नसतील तर शिक्षक भारतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा का, यावरदेखील विचार झाला. याशिवाय माजी आमदार सुधाकर कोहळे व प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांच्या नावावरदेखील चर्चा झाली. मात्र, शिक्षण मतदारसंघातील राजकारण लक्षात घेता कुठलीही तयारी नसताना ऐनवेळी उमेदवार उतरविला तर त्याचा फटका बसू शकतो, असे नेत्यांच्या लक्षात आले. दुसरीकडे पाठिंबा नसला तरी निवडणूक लढविण्याची तयारी गाणार यांनी केली होती. त्यामुळे भाजपकडून परत एकदा गाणार यांना पाठिंबा देण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
गाणार यांच्याबाबत भाजपची काय भूमिका असेल याबाबत विविध कयास लावले जात असले तरी विधान परिषदेच्या सभागृहातच फडणवीस यांनी गाणार यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांनाच पाठिंबा राहणार असल्याचे संकेत दिले होते. याशिवाय दोन दिवसांअगोदर नागपुरातदेखील यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते.