उमरेड : शिवनगर परिसरात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वास्तूचे अखेर हस्तांतरण करण्यात आले. १५ सप्टेंबर २०१९ रोजी या वास्तूचा लोकार्पण सोहळा झाला होता. तब्बल दोन वर्षांनंतरही हस्तांतरणाची गुंतागुंत सुटत नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेचे सल्लागार नथ्थुजी मेश्राम, संस्थेचे अध्यक्ष हंसदास सोमकुवर, उपाध्यक्ष निरंजन माटे, सचिव रामचंद्र गायकवाड तथा काही पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत यातून मार्ग काढला. ‘लोकमत’नेसुद्धा दिनांक २ मार्च रोजीच्या अंकात ‘लोकार्पण झाले, मग हस्तांतरणाचा मुहूर्त कधी?’ असा सवाल करीत याकडे लक्ष वेधले होते. नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, अभियंता जगदीश पटेल आदींनी सकारात्मकता दर्शवीत हस्तांतरणाचा निर्णय घेतला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सदर वाचनालयासाठी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदर योजनेत पालिकेने केवळ ५८ लाख रुपयांमध्ये इमारत उभी केली. या संपूर्ण इमारतीसाठी उमरेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने इमारत मिळविण्यासाठी विनंती अर्ज सादर करण्यात आला होता. अखेरीस प्रयत्नांना यश मिळाले, अशी प्रतिक्रिया नथ्थुजी मेश्राम यांनी व्यक्त केली. हस्तांतरण कार्यक्रमास माजी शिक्षण सभापती माया मेश्राम, नगरसेविका शालिनी गवळी, संस्थेचे सहसचिव मुन्ना फुलझले, देवानंद गवळी, पंकज आटे, मधुकर देवीकर आदींची उपस्थिती होती. नथ्थुजी मेश्राम, हंसदास सोमकुवर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र गायकवाड यांनी केले. निरंजन माटे यांनी आभार मानले.
--
उमरेड शिवनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची ही वास्तू आता हस्तांतरित करण्यात आली आहे.