लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात जनजागरण करण्यासाठी अखेर आज ड्रोन कार्यान्वित करण्यात आला. पोलिसांनी या अत्याधुनिक ड्रोनचे व्हेरायटी चौकात पत्रकारांना प्रात्यक्षिक दाखविले.नागरिकांना कोरोनाचा धोका समजावून सांगण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सर्व उपक्रम हाती घेतले आहेत. पोलिसांची गस्ती वाहने प्रत्येक भागात सकाळपासून रात्रीपर्यंत फिरून जनजागरण करीत आहेत. काही भागात सामाजिक संस्था, संघटनांच्या आणि सेवाभावी नागरिकांच्या मदतीने ऑटो लावून जनजागरण केले जात आहे. हजारावर कोविड योद्धेही सक्रिय करण्यात आले आहेत. मात्र शहरात अनेक असे भाग आहेत, ज्या भागात दाटीवाटीने घरे उभी आहेत. त्यामुळे त्या भागात पोलिसांची वाहनेच काय, ऑटोही जात नाहीत. त्यामुळे अशा भागात पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांकडून जनजागरण होऊ शकलेले नाही. ही बाब ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जनजागरणासाठी ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस लाईन टाकळी परिसरात शुक्रवारपासून ड्रोनची ट्रायल घेण्यात आली. मात्र त्याला संलग्न केलेल्या स्पीकर आणि इतर यंत्रणांचा ताळमेळ न जुळल्याने ड्रोन कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी तंत्रज्ञानांची मदत घेऊन ड्रोनला पॉवरफुल स्पीकर तसेच अन्य अत्याधुनिक उपकरणे जोडली गेली. सोमवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि त्यांच्या सहकाºयांनी व्हेरायटी चौकात पत्रकारांना ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविले. मंगळवारी सकाळपासून हा ड्रोन मोमिनपुरा, सतरंजीपुरा, भालदारपुरा आणि अशाच अन्य गर्दीच्या, दाटीवाटीच्या भागात फिरवला जाणार आहे. या ड्रोनला जोडण्यात आलेल्या स्पीकरमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे धोके नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहेत.घरातच राहा, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी करू नका, अशा सूचना हा ड्रोन देणार आहे.
कारवाईची सूचनाराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा अशाच मोठ्या नेत्यांच्या सभा, रॅली किंवा जेथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते, अशा ठिकाणी नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. मात्र कोरोनाने सर्वत्र थैमान घालून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तो रोखण्यासाठी नागपूरसह देशातील अनेक शहरात ड्रोनचा वापर केला जात आहे. नागपुरातील सतरंजीपुरा हा परिसर कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. तरीदेखील परिसरातील काहीजण विनाकारण इकडेतिकडे फिरून लॉकडाऊनचे उल्लंघन करतात. अशांवर ड्रोन नजर ठेवून त्यांना तसेच पोलिसांना कारवाई करण्यासाठी आवश्यक सूचना देईल, तसेच परिसरात जनजागरणही करेल.