नागपूर : अखेर रामदासपेठ येथील मोर हिंदी अप्पर प्रायमरी स्कूलच्या मैदानावर गरबा आयोजनास परवानगी मिळाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडून परवानगी मिळताच आयोजकांना आनंद झाला. गेल्या काही वर्षांपासून रामदासपेठेतील गरबा आयोजन वादात अडकले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आयोजकांना मनपा आयुक्तांचा कन्फर्मेशन मिळाले, परंतु पोलिसांच्या परवानगीसाठी संघर्ष करावा लागला. अखेर शुक्रवारी पोलिस व वाहतूक विभागाने परवानगी दिली. रामदासपेठ प्लॉट ओनर्स असोसिएशन व कॉन्फीडेन्स ग्रुप व अन्य सहयोगी संस्थाद्वारे रविवार, दि.१५ ते २३ ऑक्टोबरपर्यंत आयोजन करण्यात येणार आहे.
रामदासपेठेतील गरबा आयोजनासाठी स्थानिक नागरिक पवन सारडा, राहुल डालमिया व शुभांगी देशमाने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने आयोजकांना विना साऊंड जुन्या पद्धतीने गरबा खेळण्यास सांगितले होते. परंतु, आयोजकांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, मनपा प्रशासन व अन्य अथॉरिटीला १५ ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय घेण्यास सांगितले.
- एक दिवस शिल्लक, तयारीसाठी विशेष बैठक
१५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. अशात रामदासपेठ गरबा आयोजनासाठी आयोजकांजवळ केवळ एक दिवस शिल्लक आहे. परवानगी मिळाल्यानंतर रामदासपेठ प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, सचिव सचिन पुनियानी, अजय गोयल, शैलेंद्र अग्रवाल, गिरीराज सिंघी, योगेश कटारिया, संदीप मानकर, देवेंद्र पारेख, अमित पंचमतिया, यश पंचमतिया, विपुल वोरा, दिलीप फतेहपुरिया, मीना श्रॉफ, सुनिता सोनी, मनिषा पुनियानी, रुची आनंद, ट्विंकल पुरोहित, आदी उपस्थित होते.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनपा आयुक्तांकडून कन्फर्मेशन मिळाले होते. परंतु पोलिस व वाहतूक विभागाची परवानगी मिळाली नव्हती. शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व बाबी लक्षात घेत, असोसिएशनला परवानगी दिली. आम्ही अतिशय शांतेत या गरब्याचे आयोजन करू.
- सचिन पुनियानी, सचिव, रामदासपेठ प्लॉट ओनर्स असोसिएशन