लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकिटांची रक्कम ग्राहकांना परत मिळण्यासंदर्भात ‘लोकमत’ने विषय उचलून धरला होता. रक्कम परत मिळाल्यामुळे या लढ्याला यश आले आहे.नागपूरच्या हरिहर पांडे यांचे नागपूर-मुंबई प्रवासाचे ५० तिकिटांचे १ लाख ३४ हजार ७५ रुपये ‘गो एअर’ विमान कंपनीने ‘क्रेडिट शेल’मध्ये ठेवले होते. रक्कम परत देण्यासाठी कंपनीतर्फे टाळाटाळ करण्यात येत होती. ‘गो-एअरकडून क्रेडिट शेलच्या नावाने प्रवाशांची लूट’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते, हे लक्षणीय!
कोरोना काळात रद्द झालेल्या तिकिटांसंदर्भात विमान कंपन्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे, अशी भूमिका ‘लोकमत’ची होती. ‘क्रेडिट शेल’संबंधी पांडे यांनी केंद्र सरकारच्या विभिन्न मंत्रालयासोबत पत्रव्यवहार केला. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: लक्ष घालण्याची मागणी केली होती. कोरोनाच्या नावाखाली विमान कंपन्या ग्राहकांना ‘क्रेडिट शेल’चे गाजर दाखवून अडवणूक करीत होती. म्हणून पांडे यांनी राष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालयासह केंद्राच्या अनेक विभागांना तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशन काळात २५० खासदारांना पत्र लिहून लक्ष देण्याची मागणी केली होती. यावर पांडे यांना पंतप्रधान कार्यालयामार्फत मिळालेल्या पत्रात सांगण्यात आले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑक्टोबर २०२० च्या निर्देशानुसार ७ ऑक्टोबर रोजी डीजीसीएच्या परिपत्रकात रिफंड संदर्भात बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. या आदेशाचा संदर्भ घेऊन लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या विमान तिकिटांचे पैसे परत मिळू शकतात. म्हणजेच डीजीसीएच्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांची असल्याचे दिसून येत होते. या संदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात ‘एअरलाईन्सला निर्देशांचे पालन करने बंधनकारक’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती, हे महत्त्वाचे. या विषयात दखल दिल्याबद्दल केंद्र सरकार व ‘लोकमत’चे हरिहर पांडे यांनी आभार मानले आहेत.