लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असताना ही सभा रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अनिल निदान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याचबरोबर जि.प.चे सीईओ संजय यादव यांनीही सभा रद्द करण्यात यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. अखेर ही सभा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.२७ मार्चपूर्वी जिल्हा परिषदेला बजेट सादर करून शासनाकडे पाठवायचा असतो. त्या पार्श्वभूमीवर जि.प. प्रशासनाने २४ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. बजेटचे कामही पूर्ण झाले होते. कोरोनाच्या संक्रमणामुळे जिल्ह्यात कलम १४४ लावण्यात आले होते; शिवाय प्रतिबंधात्मक उपायोजना सरकारने सुरू केल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला विशेष सभा घेता येईल का? अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांकडे जि.प. प्रशासनाने केली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसात कोरोनाच्या बाबतीत शासनाने अतिशय गंभीर पावले उचलली. केंद्र सरकारने जनता कर्फ्यू, राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत लॉक डाऊन जाहीर केले. देशातील रेल्वे, राज्यातील परिवहन सेवा, विमान सेवा रद्द करण्यात आल्या. शासनाने सरकारी कार्यालयात ५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले. प्रशासनाकडून एकत्र येऊ नये, अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती सध्या अतिशय बिकट झाली आहे. बजेट सभा झाल्यास किमान १०० लोक एकत्र येणार होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अनिल निधान, जि.प. सदस्य सुभाष गुजरकर, भोजराज ठवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.याशिवाय सीईओ यांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी सभेसंदर्भात चर्चा केली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत सभाच रद्द केली आहे.
अखेर नागपूर जि.प.ची विशेष सभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 1:17 AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
ठळक मुद्देविरोधकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांनी केली मान्य