नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंनी घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या पुढाकारामुळे वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षेनंतर वसतिगृहात राहता येणार नाही, या नियमाचा दाखला देऊन या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना कुलूप लावण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा तयारी किंवा ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन आपली समस्या मांडली व डॉ.काणे यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तत्काळ पावले उचलली. ‘एलएलएम’सह विविध अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहात राहतात. बरेचसे विद्यार्थी हे सामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थी गावाकडे गेले होते. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू व्हायला अवकाश असला तरी यातील काही विद्यार्थी विविध कारणांमुळे अगोदरच परतले. अनेक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत तर ‘एलएलएम’च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशीप’ सुरू आहे. मात्र वसतिगृहात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खोल्यांना कुलुपे लागली होती. याबाबत त्यांनी ‘वॉर्डन’कडे विचारणा केली असता नियमांचा दाखला देण्यात आला. सुट्यांनंतर पुढील शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर नियमांनुसार प्रवेश घ्यावा लागेल. सध्या महाविद्यालये सुरू नसल्याने तेथे राहता येणार नाही, असे सांगण्यात आले. जर रहायचे असेल तर विद्यापीठात वेगळे शुल्क भरावे लागेल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चिंतित विद्यार्थ्यांनी गुरुवार व शुक्रवार अशी सलग दोन दिवस कुलगुरूंची भेट घेतली व आपली समस्या मांडली. आम्ही अद्यापही विद्यापीठाचेच विद्यार्थी असूनदेखील आम्हाला राहू दिले जात नाही. अतिरिक्त शुल्क भरणे आम्हाला शक्य नाही, असे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सांगितले. याबाबत कुलगुरूंनी विद्यार्थीहिताला प्राधान्य देत संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज करायला सांगितला व त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. नियमांनुसार विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये राहता येत नाही. मात्र अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षांसाठी अर्ज भरल्याची पावती जोडून त्यांनी अर्ज करावा. तसेच ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वकिलांचे पत्र लावून अर्ज केल्यावर त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यापीठ हे विद्यार्थी हितासाठीच आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे कुलगुरूंनी ‘लोकमत’ला सांगितले.
अखेर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय
By admin | Published: May 27, 2017 2:48 AM