नरेश डोंगरे नागपूर : दरवर्षी होणाऱ्या बदल्याची पद्धत यावर्षी बदलली आहे. यंदा आरटीओतील बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे बाहेरचा कुणी व्यक्ती पसंतीच्या ठिकाणी बदली करून देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन करणारे परिपत्रक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी काढले आहे. ‘लोकमत’च्या दणक्यामुळेच हा निर्णय झाला आहे. त्यामुळे बदलीच्या संबंधाने 'सेटिंग' करणाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विशेष उल्लेखनीय असे की, आरटीओतून निवृत्त झालेले खाडे नामक व्यक्ती कल्याण येथे कार्यरत असलेल्या पवार नामक एका कर्मचाऱ्याला घेऊन ८ मार्चला नागपुरात आले होते. येथील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये त्यांनी नागपूर विदर्भातील आरटीओत कार्यरत काही बदली इच्छुकांची भेट घेतली. यावेळी एका महिला अधिकाऱ्याच्या माध्यमातून मोठी डील झाल्याचा संशय असल्याने ‘लोकमत’ने या संबंधाने ९ ते १२ मार्चदरम्यान वृत्तमालिका चालविली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहन विभागातील शिर्षस्थ अधिकाऱ्यांना बोलवून यापुढे आरटीओतील बदल्या पारदर्शी अर्थात ऑनलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना या संपूर्ण गैरप्रकाराची कसून चाैकशी करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर विशेष तपास पथका (एसआयटी)कडून या प्रकरणाची चाैकशी सुरू झाली. गेल्या पाच दिवसांत अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर, येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रा) विजय चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी एक परिपत्रक काढले. आरटीओतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे परिपत्रक पाठविण्यात आले. या संबंधाने अधिक माहिती घेण्यासाठी चव्हाण यांच्याशी अनेकदा संपर्क साधला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
असे आहे परिपत्रकप्रत्येक वर्षी नियतकालिक बदल्या होत असतात; परंतु सन २०२३ मध्ये होणाऱ्या नियतकालिक बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे बाह्यस्रोताद्वारे कुणीही बदलीचे आमिष दाखविल्यास, पसंतीच्या ठिकाणी बदली करून देतो, तसेच बदलीबाबतच्या अशा अनेक विविध प्रकारचे प्रलोभन दिल्यास बळी पडू नये. अशा प्रकारचे प्रलोभन कुणी दिल्यास त्याची त्वरित कार्यालयास माहिती द्यावी. अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा काहीही अनुचित प्रकार घडल्यास आपण स्वत: सर्वस्वी जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी.