नागपूर : नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून दोन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातून प्रिंटींगला सुरुवात झाली आहे. १२ हजार वाहन परवाना तर ३ हजार आरसी प्रिंटींग करून ती पोस्ट खात्यात पाठविण्यात आली आहे.
परिवहन विभागाने हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीकडे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तर हैद्राबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनीकडे (युटीएल) वाहन परवाना (लायसन्स) प्रिटींंगची जबाबदारी दिली होती. आठ महिन्यांपूर्वी या दोन्ही कंपनीशी असलेला करार संपला. नवीन कंपनी नेमायला व करार करायला परिवहन विभागाकडून उशीर झाला. कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड अॅण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमीटेड’, कंपनीसोबत नुकताच करार झाला. या कंपनीला ‘स्मार्ट कार्ड’ प्रिंट करण्यासाठी नागपूरच्या पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जागाही दिली. खुद परिवहन विभागाचे संगणक प्रमुख संदेश चव्हाण यांनी जुलै महिन्यात प्रिटींगला सुरुवात होण्याची ग्वाही दिली. परंतु सप्टेंबर महिन्याला सुरुवात होऊनही प्रिटींगला सुरुवात झाली नव्हती. मागील आठवड्यात प्रिंटींगची ट्रायल घेऊन आता ती सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात येते.