नागपूर : शाळेची ९,५०० रुपये पूर्ण फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही, असे मुख्याध्यापिकेने पालकांना स्पष्ट बजावले. कोरोनामुळे नोकरी गेली. मी दोन घरचे काम करून कुटुंब चालविते, तरीही ७,५०० रुपये भरतो, टीसी द्या, अशी विनंती पालकांनी केली. पण, मुख्याध्यापिकेने नकार दिल्याने पालकांनी शाळेपुढेच फीसाठी भीक मागायला सुरुवात केली. भिकेतून आलेले आणि स्वत:च्या जवळील असे ९,५०० रुपये पालकांनी फीच्या रूपात शाळेत भरले. शाळेच्या फीसाठी पालकांना भीक मागावी लागणे हे दुर्दैवच आहे.
अरहंत राजेंद्र बागडे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो रिंग रोडवरील एका स्कूलमध्ये पाचवा वर्ग शिकला. पण, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली. आई दोन घरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी शाळेची फी भरणे शक्य नसल्याने त्यांनी मुलाला सरकारी शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. सरकारी शाळेत दाखलाही घेतला, पण जुन्या शाळेतून टीसी आणल्याशिवाय दाखल खारीजवर विद्यार्थ्याची नोंद होणार नाही, असे शाळेने सांगितले. त्यामुळे अरहंतची आई संगीता यांनी टीसीसाठी शाळेत अर्ज केला. पण, मुख्याध्यापिकेने सांगितले की शाळेची ९,५०० रुपये पूर्ण भरल्याशिवाय टीसी देणार नाही. पालकांनी सामाजिक कार्यकर्ता खुशाल ढाक यांच्या माध्यमातून मुख्याध्यापिकेला पुन्हा विनंती केली. मुख्याध्यापिका ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. त्यांनी भीक मागा, पण शाळेची फी भरा, असा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे खुशाल ढाक व पालकांनी शाळेपुढे शनिवारी भीक मागायला सुरुवात केली. भिकेच्या रूपात आलेला पैसा आणि जवळ असलेल्या पैशांतून त्यांनी शाळेची पूर्ण फी भरली.
फी घेणे हा शाळेचा अधिकारच
रस्त्यावर सुरू असलेला भीक मागण्याचा प्रकार बघून पोलीस घटनास्थळी पोहोचले. शाळेच्या मुख्याध्यापिकेने पूर्ण फी भरावीच लागेल, असा अट्टाहास पोलिसांपुढे धरला. पोलिसांनीही मुख्याध्यापिकेच्या अट्टाहासापुढे तडजोड करण्याची भूमिका न घेता, पालकांना फी भरावीच लागेल, असा सल्ला देत, फी घेणे हा शाळेचा अधिकारच असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी तुम्ही भीक मागून गुन्हा करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता व पालकांना सुनावले.
- कोरोनामुळे पालकांचीच नाहीतर, शाळांचीही स्थिती गंभीर झाली आहे. संस्थाचालकांनाही शिक्षकांचा पगार, शाळेचे मेंटेनन्स यावर खर्च करावा लागला आहे. या प्रकरणात पालकांनी पहिली ते चवथीपर्यंत शाळेची नियमित फी भरली. कोरोनामुळे त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढावली. त्यातही फीचे काही पैसे भरण्यास पालक तयार असताना शाळेने तडजोडीची भूमिका दाखविली असती तर शिक्षणाच्या नावावर असा लाजिरवाणा प्रकार घडला नसता.