(लोकमत इंम्पॅक्ट)
महावितरण कंपनीला १५ दिवसांनी आली जाग
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : वादळामुळे चिचाळा शिवारात विजेच्या तारा तुटल्या हाेत्या व काही खांबही उन्मळून पडले हाेते. त्यामुळे या भागातील कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. महावितरण कंपनीला १५ दिवसांनी का हाेईना जाग आली आणि त्यांनी त्या तुटलेल्या तारा व काेसळलेले खांब पूर्ववत केले.
वादळामुळे या भागातील वीज वितरण व्यवस्था काहीसी विस्कळीत झाली हाेती. त्यातच पंधरवड्यापूर्वी आलेल्या वादळामुळे चिचाळा शिवारातील सतीश पडोळे, रमेश बालपांडे, राजेश्वर नंदरधने, हेमंत महाकाळकर व ज्ञानेश्वर महाकाळकर यांच्या शेतातील विजेचे खांब उन्मळून पडले हाेते. त्यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. या शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला वारंवार सूचना व लेखी निवेदने देऊनही कंपनीचे कर्मचारी तारा जाेडण्यास व खांब व्यवस्थित करण्यास दिरंगाई करीत हाेते. विशेष म्हणजे, तारा व खांब शेतातच पडून हाेते.
यासंदर्भात लाेकमतमध्ये बुधवारी (दि. २) ‘विजेच्या तुटलेल्या तारा पूर्ववत कधी करणार?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले हाेते. वीजपुरवठा खंडित असल्यने भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत असून, त्या तारा चाेरीला जाण्याची शक्यताही त्या वृत्तात व्यक्त केली हाेती. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वृत्ताची तातडीने दखल घेत त्या तारा जाेडण्याचे व खांब व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या कामाला गुरुवारी (दि. ३) सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी दाेन दिवसात संपूर्ण काम पूर्ण करून पडलेले खांब पूर्ववत केले आणि त्यावर ताराही व्यवस्थित जाेडल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.