नागपूर : पशुवैद्यक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांएवढाच आंतरवासीय भत्ता देण्यात येणार आहे. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात यापुढे पशुवैद्यकांना ११,००० रुपये मासिक भत्ता देण्याची घाेषणा केली.
पशुवैद्यक हा आराेग्य सेवेतील महत्त्वाचा घटक असून व्यावसायिक अभ्यासक्रमात पशुवैद्यक शास्त्राचा दर्जा एमबीबीएसच्या बराेबर मानला जाताे. अभ्यासक्रमाचा कालावधीही सारखाच आहे. असे असताना पशुवैद्यक विद्यार्थ्यांना केवळ ३००० रुपये मासिक भत्ता दिला जात हाेता, जेव्हा की मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ११,००० रुपये दिले जातात. या अवस्थेत पशुवैद्यकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) ने आपल्या महसुलातून विद्यार्थ्यांना ४५०० रुपये मासिक भत्ता देण्याचा निर्णय घेतला हाेता. तुटपुंज्या भत्त्यामुळे पशुवैद्यक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत हाेता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वारंवार आंदाेलन करून वाढीव आंतरवासीय भत्त्याचा मुद्दा शासन दरबारी रेटून धरला हाेता.
माफसूनेही या विषयावर वेळाेवेळी पाठपुरावा केला. अशा परिस्थितीतही पशुवैद्यकांनी राज्यात जनावरांवर आलेल्या लम्पी आजाराविरुद्धच्या लढ्यात माेलाचे याेगदान दिले. याची दखल घेत शासनाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पशुवैद्यकांचा आंतरवासीय भत्ता मेडिकलच्या विद्यार्थ्यांएवढा करण्याचा निर्णय घेतला.