कन्हान (नागपूर) : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्टाफ बस फ्लाय ओव्हरच्या कठड्यावर धडकली. बसचे दार उघडल्याने दाराजवळ बसलेले विद्यापीठातील वित्त अधिकारी खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला.
ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारात शुक्रवारी (दि. ११) सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास घडली. कैलास विनायक मून (५७, रा. ओमकार नगर, नागपूर) असे मृताचे नाव असून, ते रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात वित्त अधिकारीपदी कार्यरत होते. विद्यापीठाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी एमएच-४०/सीडी-०६९२ क्रमांकाची खासगी बस दाेन वर्षाच्या करारावर किरायाने घेतली हाेती. विद्यापीठातील कर्मचारी राेज या बसने नागपूरहून रामटेकला ये-जा करायचे. त्यात कैलास मून यांचाही समावेश हाेता.
विद्यापीठातील ३२ कर्मचारी या बसने शुक्रवारी सकाळी नागपूरहून रामटेक येथे जाण्यास निघाले. कैलास मून हे बसच्या दाराजवळ बसले हाेते. ही बस डुमरी शिवारातील फ्लाय ओव्हरजवळ येताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली ही बस फ्लाय ओव्हरच्या कठड्यावर धडकली. धडक लागताच बसचा दरवाजा उघडला आणि कैलास मून खाली काेसळले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. इतरांना मात्र कुठलीही दुखापत झाली नाही. त्यांना लगेच रामटेक शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले.
तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी राजेंद्र मेश्राम (५४, रा. नागपूर) यांच्या तक्रारीवरून बसचालक बनवारीलाल सोनवाने (६५, रा. नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून तवपास सुरू केला आहे.