कमल शर्मा
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाची तयारी शहरात युद्धपातळीवर केली जाईल. विशेषत: सिव्हिल लाइन्स परिसर नववधूप्रमाणे सजणार आहे. मात्र मागील वर्षातील कामांची देयके अद्याप मिळालेली नसल्याने हिवाळी अधिवेशनावर आर्थिक संकटाचे सावट आहे.
२०२२ मध्ये तीन वर्षांच्या कालावधीनंतर विधिमंडळाचे शहरात आगमन झाले. कोविड काळात रविभवन आणि आमदारांचे निवासस्थान कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जात होते. त्यामुळे बेडशीटपासून नवीन पडदे लावण्यात आले. सर्व चकाचक करण्यात आले. या कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. मात्र, ठेकेदारांनी सुमारे ३० टक्के बिलो निविदा स्वीकारल्या. परिणामी खर्च ७० कोटींवर आला परंतु हा निधीसुद्धा मिळालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त ३८ कोटींचा निधी मिळाला. मुंबईहून उर्वरित ३२ कोटी अजूनही प्राप्त झालेले नाही.
विधानभवन, सचिवालयाचे अधिक दायित्व
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी दोन हेडमध्ये निधीचे वाटप केले जाते. २०५९ अंतर्गत कार्यालय आणि अनिवासी ठिकाणांना निधी मिळतो. तसेच २२१६ अंतर्गत निवासी खर्च केला जातो. निवासी खर्चावर सरकारची कृपादृष्टी आहे. यावरील खर्चापैकी ७५ टक्के रक्कम मिळाली आहे. मात्र विधानभवन, सचिवालय अशा इमारतींवर झालेला खर्च अद्याप मिळालेला नाही.
निधी मिळण्याची आशा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांना निधी मिळण्याची आशा आहे. मागील पैसे मिळाले तरच अधिवेशनात कंत्राटदार आणि इतर एजन्सी काम करण्यास तयार होतील. दिवाळीपूर्वी थकबाकी मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे.