नागपूर : मेडिकलमधील ‘बीपीएल’च्या नावावर झालेल्या आर्थिक घोटाळ्यात सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एक कनिष्ट लिपीक दोषी आढळून आला. कर्मचाºयांची सेवा समाप्त करून लिपीकाचा निलंबनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाची अजनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
मेडिकलमधील विविध चाचण्या व उपचाराचे शुल्क तिजोरीत जमा न करता रुग्णाला ‘बीपीएल’ दाखवून शुल्काचे पैसे खिशात टाकण्याचा प्रकार समोर आला. याची दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेऊन चौकशी समिती स्थापन केली. समितीने आर्थिक देणाण-घेवाण करणाऱ्यांची साक्ष, नोंदी आणि पावतीचे पुरावे गोळा केले. त्यात सहा कंत्राटी व एक स्थायी कर्मचारी अभिजित विश्वकर्मा दोषी आढळले. तसा अहवाल अधिष्ठात्यांकडे सादर केला. डॉ. गजभिये यांनी कठोर निर्णय घेत सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून विश्वकर्माच्या निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याकडे सादर केला. सुमारे पाच लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.