नागपूर : मेडिकलच्या रुग्णांकडून विविध चाचण्या व प्रक्रियेसाठी घेतलेले पैसे तिजोरीत जमा न करता संबंधित रुग्णाला ‘बीपीएल’ दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली. लाखो रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी चौकशीचे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येणाऱ्या गरीब रुग्णांच्या पैशांचा लुबाडणुकीच्या या प्रकारात शुल्क आकारण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यापासून त्यावर देखरेख ठेवणारे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.
मेडिकलमधील पूर्वी ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टम’ (एचआयएमएस) होती. यात रुग्णांवरील उपचारापासून ते आकारण्यात आलेल्या शुल्काची माहिती ‘ऑनलाइन’च्या मदतीने एका क्लिकवर मिळत होती. परंतु, जून २०२२ पासून ही प्रणाली बंद करण्यात आली. मागील सहा महिन्यांपासून मेडिकल प्रशासनाने एक खासगी सॉफ्टवेअर कंपनी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. विविध चाचण्या व उपचाराचे शुल्क आकारण्याची व त्याची ऑनलाइन नोंद करण्याची जबाबदारी ६६ क्रमांकाच्या खिडकीवरील कर्मचाऱ्याला दिली. येथे नेमलेला एक कर्मचारी हा मेडिकलचा, तर उर्वरित कंत्राटी कर्मचारी आहेत. याच खिडकीतून हा आर्थिक घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.
- ५७० ऐवजी तिजोरीत जमा केले १२० रुपये
प्राप्त माहितीनुसार, १३ जून रोजी मेडिकलमधील सर्जरी कॅज्युअल्टीमध्ये उपचारासाठी आलेल्या एका ३९ वर्षीय पुरुष रुग्णाकडून सीबीसी, केएफटी, एलएफटी, एसआर सोडियम, एसआर पोटॅशिअम, एक्स-रे व ईसीजी मिळून ५७० रुपये शुल्क घेतले. त्याची पावतीही दिली. परंतु, सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंदणी करताना रुग्णाला ‘बीपीएल’ दाखवून ‘ओपीडी’ शुल्क २० रुपये आणि ‘एचबी’ चाचणीचे १०० असे एकूण १२० रुपये तिजोरीत जमा केले. धक्कादायक म्हणजे, मागील चार-पाच महिन्यांपासून हा घोटाळा सुरू आहे. परंतु, त्याची तक्रार आता होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- वैद्यकीय अधीक्षक कार्यालयावरही संशय
सुत्रानूसार, काही महिन्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात करण्यात आली. परंतु, कोणावरच कारवाई न झाल्याने हे कार्यालयही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.
- चार सदस्यांची चौकशी
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले, या प्रकरणाची तक्रार पुढे आल्यानंतर अधिष्ठातांनी सोमवारी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चार सदस्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. लवकरच अहवाल सादर केला जाईल.