बाबा रामदेव : पंतप्रधानांची कार्यपद्धती उत्कृष्टनागपूर : देशाच्या बाजारपेठेचे विदेशीकरण झाले आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीतच आहे. पतंजलीच्या माध्यमातून स्वदेशीचा जागर करीत ही आर्थिक गुलामगिरी संपविण्याचा संकल्प योगगुरू बाबा रामदेव यांनी केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे योगगुरू रामदेवबाबा यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबांनी स्वदेशीच्या नावाने उद्योग व राजकीय घडामोडींवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. बाबांनी स्वदेशीचा जागर करताना देशातून आर्थिक गुलामगिरी संपविण्याचे पतंजलीचे धोरण असल्याचे सांगितले. देशात १० मोठ्या उद्योगांबरोबर, ५० हून अधिक छोटे उद्योग उभारून, असंख्य ग्राम, लघु व कुटीर उद्योगांना जोडणार असल्याचे सांगितले. देशाची आंतरिक व बाह्य सुरक्षा मजबूत ठेवावी, देशोपयोगी धोरणांची अंमलबजावणी करावी व जगभरात देशाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, ही एका चांगल्या पंतप्रधानांची कार्यप्रणाली असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही क्षेत्रात सर्वश्रेष्ठ काम केले असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. परंतु दुसरीकडे त्यांनी काळ्या पैशाबाबत सरकारचे परिणामकारक प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. काळ्या पैशासंदर्भात सरकारने परिणामकारक व पारदर्शक धोरण राबविण्याबरोबरच, दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे ते म्हणाले. आपण काळ्या पैशाचा मुद्दा उचलल्यास विरोधकांबरोबर सरकारमध्ये अंतर्गत बोंबाबोंब होत असल्याची टीकाही त्यांनी केली. अधिक रकमेच्या नोटांचा वापर होऊ नये या संदर्भात आपली भूमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीकडे २०० हून अधिक संशोधक, क्वॉलिटी प्रॉडक्टची जगातील सर्वात बेस्ट टीम व कोट्यवधी लोकांचा विश्वास असल्यामुळे २०१६-१७ मध्ये १० हजार कोटींचे पतंजलीचे लक्ष्य आहे.(प्रतिनिधी) आता पतंजलीची जिन्सआयुर्वेद, ‘एफएमसीजी’ उत्पादन क्षेत्रात आपल्या अस्तित्वाची यशस्वी छाप सोडल्यानंतर पतंजली आता जिन्सची निर्मिती करणार आहे. आमची स्वदेशीची भूमिका आहे. चॉकलेट, नुडल्स अशा अन्य गृहोपयोगी वस्तूंवर, विदेशी कंपन्यांची छाप होती. या वस्तूंना पतंजलीने स्वदेशी केले आहे. वेशभूषेतही स्वदेशी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पतंजली स्वदेशीची जिन्स निर्माण करून, विदेशी कंपन्यांनाही स्वदेशी जिन्स निर्माण करण्यास भाग पाडणार आहोत. पतंजलीचे स्वदेशी जिन्सच्या संदर्भात संशोधन झाले आहे. लवकरच त्याचे उत्पादन करणार असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.
आर्थिक गुलामगिरी नष्ट करणार
By admin | Published: September 12, 2016 3:10 AM