लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. महापालिका व इटलीचे शिष्टमंडळा यांच्यात येत्या ३ जुलैला सामंजस्य करार होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी दिली.हवामानातील बदल हे त्या शहरात होणाऱ्या प्रदूषणावर अवलंबून असतात. औद्योगिकीकरण व वाहनांचा होणारा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होते. परिणामी पृथ्वीवरील उष्णता वाढते. यामुळे ग्लेशिअर अर्थात बर्फ वितळत असल्याने समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. यालाच ग्लोबल वार्मिंग म्हणतात. हे सर्व थांबविण्याकरिता कार्बन उत्सर्जन थांबविण्यावर काम करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेच महापालिकेन इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा विचार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अपारंपरीक ऊर्जा स्रोत अर्थात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यावर भर द्यावा लागेल. शिवाय, जे प्रदूषण शहरात आधीच झाले आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. याकरिता, इटली देशाने नागपूर शहरासोबत करार करण्यास तयारी दर्शविली आहे. पर्यावरणासाठी ते शहराला आर्थिक मदत करणार आहेत.
‘वर्ल्ड काँग्रेस’मध्ये महापौरांचा सहभागहवामानातील होणाऱ्या बदलाचा सामना करण्यासाठी कॅनडातील मोन्ट्रेल शहरात आयोजित वर्ल्ड काँग्रेसमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी सहभाग घेतला होता. यात नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी नागपूर महापालिका प्रयत्नशील असल्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. भारतातून एकमेव नागपूर शहराला वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.