लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेंगदाणा तेल हे सर्वांच्या घरातील अविभाज्य भाग असून, या तेलाच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या तेलात कोणती भेसळ करण्यात येते हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हातर्फे करण्यात आली आहे.ठोक बाजारात शेंगदाणा ६५ ते ८० रुपये किलो आहे. एक किलो शेंगदाण्यातून ४०० ते ४५० गॅ्रम तेल निघते. एक किलो तेलाचे उत्पादन मूल्य १५० ते १८० रुपये आहे. या मूल्यावर सरकारी कर, कारखान्याचा आस्थापना खर्च, विविध पातळीवर नफा आणि विविध खर्च ही सर्व गोळाबेरीज केली तर कच्चे तेल २०० ते २२० रुपये याप्रमाणे ग्राहकास मिळावयास हवे. डबल फिल्टर केलेले व रिफाईन तेल त्यापेक्षाही महाग मिळावयास हवे.पण सध्या बाजारात उपलब्ध असलेले ब्रँडेड डबल फिल्टर केलेले तेल १२० ते १५० रुपये प्रति लिटर चिल्लरमध्ये उपलब्ध आहे. हा सर्व हिशेब पाहिल्यास शेंगदाणा या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असावी, अशी शंका आहे.भेसळयुक्त तेलामुळे मानवी शरीरावर परिणाम होतो. तसेच रिफाईन तेल वापरणे हे देखील आरोग्यास हानीकारक आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून ग्राहकांना शुद्ध तेल उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, जिल्हा सचिव नरेंद्र कुळकर्णी, उदय दिवे, शनेश्वर चौधरी, बब्बू शेख यांनी केली आहे.
शेंगदाणा तेलातील भेसळ शोधा; अ. भा. ग्राहक पंचायतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:07 AM
शेंगदाणा तेलाच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या तेलात कोणती भेसळ करण्यात येते हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हातर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकच्चे तेल २०० ते २२० रुपये याप्रमाणे ग्राहकास मिळावयास हवे