विभागात ४९ रुग्ण, १२ मृत्यू : शहरात ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदनागपूर : नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ४९ रुग्ण आढळून आले असून १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, एकीकडे तापमान आपला उच्चांक गाठत असताना आणि स्वाईन फ्लूचा विषाणू या तापमानातही तग धरून राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या प्रकाराला घेऊन आरोग्य विभाग काही बोलायला तयार नसल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली जात आहे.उपराजधानीचे तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. या वातावरणातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने स्वाईन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूने स्वत:मध्ये परिवर्तन केले असावे, अशी शंका डॉक्टर बोलून दाखवित आहे. त्यांच्यानुसार ‘एच१एन१’ पॉझिटिव्ह आलेल्या आणि ‘इन्फ्लूएन्झा’ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये सारखे लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे उपचार करणे कठीण जात आहे. यातच या दोन्ही रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण गंभीर होत असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे सतत थंडी वाजणे, एकसारखा ताप असणे, खोकला, सर्दी, घसा दुखणे किंवा खवखवणे, अंगदुखी, पोटदुखी ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)शहरात २८ रुग्ण, २ व्हेन्टिलेटरवरशहरात जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १४ रुग्ण यातून बरे झाले आहेत. उर्वरित आठ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. हे दोन्ही रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात स्वाईन फ्लूने सात रुग्णांचा बळी घेतल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागात नोंद आहे.नागपूर विभागातही वाढताहेत रुग्णनागपूर विभागात जानेवारी ते आतापर्यंत १५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यात ४९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये एक, मेयोमध्ये सहा रुग्ण सोडल्यास इतर सर्व रुग्ण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. यातील काही बरे होऊन त्यांना सुटीही देण्यात आली आहे.आतापर्यंत ढगाळ व दमट वातावरणात स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसायचे, परंतु आता ४० ते ४४ अंशाच्या तापमानातही स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहे. एकतर या विषाणूचा प्रवासादरम्यान संसर्ग होत असेल किंवा या विषाणूत परिवर्तन झाले असावे याचीही शक्यता आहे. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.-डॉ. अशोक अरबट, श्वासविकार व अॅलर्जी तज्ज्ञ
स्वाईन फ्लूचा उपराजधानीला विळखा
By admin | Published: April 18, 2017 1:45 AM