लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेला मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी सर्वाेत्तम उपाय शाेधण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे वनमंत्री संजय राठाेड यांनी व्यक्त केले. वनविभागातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय वाईल्डकाॅन परिषद २०२० च्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.
ऑनलाईन झालेल्या वाईल्डकाॅन परिषदेचे शुक्रवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए.एम. पातुरकर, कामधेनू विद्यापीठ, दुर्गचे कुलगुरू डाॅ. एन. पी. दक्षिणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एन. एच. काकाेडकर, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन प्रामुख्याने उपस्थित हाेते. भारतीय प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एम. अरोरा ऑनलाईन सहभागी झाले. एन. वासुदेवन यांनी गोरेवाडा बचाव केंद्र, गोरेवाडा येथे स्थित
डब्ल्यूआरटीसीच्या कारभारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नितीन काकोडकर यांनी राज्यातील मानवी-वन्यजीव संघर्ष निवारणासाठी पशुवैद्य आणि वनविभाग यांच्यातील एकत्र काम करण्याबाबत प्रकाश टाकला. माफसु व वनविभागाचा सहयोग वन्यजीव संवर्धनाकरिता अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास डाॅ. पातुरकर यांनी व्यक्त केला. डॉ. विनोद धूत यांनी संचालन केले व डॉ. सुजित कोलंगथ यांनी आभार मानले. ही परिषद दाेन दिवस चालणार आहे.