जिल्हा प्रशासनाचा दावा फोल : मुलाच्या प्रमाणपत्रासाठी आईची धावपळ नागपूर : कुठलेही प्रमाणपत्र दोन ते तीन दिवसात मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कामी लावली आहे. लोकांना तातडीने प्रमाणपत्र उपलब्ध होत आहेत, असा दावाही केला जात आहे, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आला. महिना उटलूनही एका विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. प्रवेशासाठी काही दिवस शिल्लक असल्याने आपला कामधंदा सोडून त्या विद्यार्थ्याची आई मुलाच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करीत होती, परंतु कुणीही तिची मदत करायला तयार नव्हते. रत्नमाला ढोबळे असे या महिलेचे नाव. त्या वर्धमाननगर येथील त्रिमूर्तीनगरात राहतात. त्यांचा मुलगा प्रज्वल ढोबळे याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पॉलिटेक्निकला त्याला प्रवेश घ्यायचा आहे. जात प्रमाणपत्र आणि क्रिमिलेयरसाठी त्याने शास्त्रीनगर येथील ई-सेवा केंद्रात अर्ज केला. गेल्या महिन्यात २२ तारखेला त्याने अर्ज केला. जिल्हाधिकारी देतील का लक्ष? सामान्यांना कुठल्याही प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे प्रयत्न करीत आहेत. तसे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत. कामाला सुरुवातही झालेली आहे. परंतु या प्रकरणामुळे कुठे तरी त्रुटी राहून गेल्याचे दिसून येते. तेव्हा या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का? असा प्रश्न आहे.
महिना झाला जात प्रमाणपत्र मिळेना
By admin | Published: June 28, 2016 2:32 AM