कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नव्यानेच उदयास आलेल्या आम आदमी पक्षाने नागपुरात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना रिंगणात उतरविले होते. दमानिया यांच्या ‘फायटर इमेज’चा पक्षाला बऱ्यापैकी फायदा झाला. मात्र, निवडणुकीनंतर दीड वर्षांनी दमानिया यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे आता दमानियांचा पर्याय म्हणून तेवढ्या इमेजचा उमेदवार शोधताना ‘आप’ला चांगलाच दम लागतोय. यावेळी पक्षाचा उमेदवार आयातीत नको तर स्थानिक असावा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्यामुळे आप नेत्यांचा ताप आणखीणच वाढणार आहे.अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत एकहाती सत्ता मिळविल्यानंतर देशभरात त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याच काळात भ्रष्टाचाराविरोधात पक्षाने लढा तीव्र केला होता. पक्षाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी दिली. दमानिया आक्रमपणे लढल्या. त्यांना नागपूरकर मतदारांची अनपेक्षित साथही मिळाली. त्यावेळी नवखा पक्ष असताना, नागपुरात पहिल्यांदाच निवडणूक लढवित असतानाही दमानिया यांना तब्बल ६९ हजार ८१ मते मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा हजार व अधिक मते मिळाली. पश्चिम नागपुरात १३ हजार ७६ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपुरात तब्बल १४ हजार ३१३ मते मिळाली. मतांची ही आकडेवारी राजकीय पक्षांना धडकी भरविणारीच होती.विधानसभेच्या निवडणुकीत आपने आपले उमेदवार रिंगणात उतरविले नाही. मात्र, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अन्यता नोटाचा वापर करू, अशी भूमिंका घेतली. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतही आप प्रत्यक्ष मैदानात उतरली नाही. यावेळीही तीच भूमिका कायम ठेवली. पक्षाकडून त्यावेळीही कुणाला एकाला पाठिंबा दिला गेला नाही. त्यामुळे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मनाला पटेल त्याचे काम करताना दिसले. यानंतर झालेल्या गोवा व पंजाबच्या निधानसभा निवडणुकीत आपने उडी घेतली. गोव्यात ६ टक्के मते घेतली तर पंजाबमध्ये २२ जागा जिंकल्या. या यशाने आपचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. नागपुरात तर ‘बूथ मॅनेजमेंट’पर्यंतची रणनीती आखून त्या दिशेने कामही सुरू झाले आहे. मात्र, भावी उमेदवाराबाबत चिंता कायम आहे. यावेळी बाहेरच्या व्यक्तीऐवजी नागपुरातीलच सक्षम व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता हा आग्रह पूर्ण होतो की पुन्हा थेट दिल्लीवरूनच उमेदवार येतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.
‘आप’कडे जेथे मजबूत उमेदवार असतील त्याच मतदारसंघात निवडणूक लढविली जाईल. देशाची परिस्थिती व वातावरण विचारात घेऊन आम्ही लढणार आहोत. पक्षाची नागपुरातही जोरात तयारी सुरू आहे. या वेळी राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक पातळीवरील ‘क्लीन इमेज’ असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर आहे.- देवेंद्र वानखेडे, संयोजक,आम आदमी पार्टी
विधानसभा कमिट्या स्थापन‘आप’ची राज्य कमेटी नुकतीच स्थापन झाली. त्यानंतर विधानसभा व तालुका कमिट्या स्थापन केल्या जात आहेत. नागपूर लोकसभेअंतर्गत पूर्व नागपूर वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात कमिटी स्थापन झाली आहे. ग्रामीणमध्ये काटोल व रामटेक या दोन विधानसभा मतदारसंघातही कमिटी नेमली आहे. प्रत्येक विधानसभेत संयोजक, दोन सहसंयोजक, सचिव, सहसचिव, महिला अध्यक्ष, युवा अध्यक्ष व विविध आघाड्यांचे अध्यक्ष असे साधारणत: १५ ते २० प्रमुख पदाधिकारी नेमले आहेत. यानंतर प्रभाग व बूथ स्तरावर बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पक्षातर्फे सदस्य नोंदणीसाठी १५ आॅगस्टपासून मोहीम राबविली जाणार आहे. आॅनलाईन नोंदणीसह कार्यकर्ते घरोघरी जाऊन नोंदणी करतील.