नागपूर : १८ वर्षांखालील मुले-मुली ५० सीसीहून जास्त क्षमतेची दुचाकी चालविताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व २५ वर्षांचे होईपर्यंत वाहन परवाना देऊ नका, असे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. यामुळे दुचाकीचा सर्वाधिक वापर करणाऱ्या बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचा पालकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात मागील वर्षी झालेल्या रस्ते अपघातांपैकी ५१ टक्क्यांपेक्षा अधिक अपघात दुचाकी चालकांचे झाले आहेत. यात ७ हजार ७०० जणांनी आपला जीव गमावला आहे. याचा अभ्यास केल्यावर हेल्मेट न घातल्यामुळे व डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध कायदेशीर, तसेच आवश्यक उपाययोजना राबवून २०३० पर्यंत ५० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिले आहे.
- काय आहे परिवहन आयुक्तांचा आदेश?
रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यास अपघातात जीव गमावण्याची शक्यता अधिक असते. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना हेल्मेटविषयी दुचाकी चालकांचे समुपदेशन व हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड व २५ वर्षांपर्यंत लायसन्स देण्यापासून प्रतिबंध करण्याचे आणि पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दर महिन्याला अहवाल सादर करावा लागणार
आरटीओ कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वाराचे शिवाय, कॉलेज, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था व कंपन्यांना भेट देऊन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक समुपदेशन करून जनजागृती करण्याचा, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचाही सूचना आहेत.
- पाच महिन्यांत किती अल्पवयीनवर कारवाई?
जानेवारी ते मे या पाच महिन्यांत शहरात ३५ अल्पवयीन वाहन चालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून दंडाच्या स्वरुपात १ लाख ८० हजार रुपये आकारण्यात आले. आता ही कारवाई आरटीओंकडूनही होणार आहे.
दुचाकींचे अपघात जास्त
रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे संख्या सर्वाधिक असते. यांच्यात मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यावर व त्याची संमती देणाऱ्या पालकांवरही आता कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. विशेषत: अल्पवयीन दुचाकीस्वारावर आरटीओची नजर असणार आहे.
- रवींद्र भूयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.