लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये महसूल, पाेलीस व नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त पथकाने काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत पथकाने कामठी शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंड ठाेठावत ७९ रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्याम मंदनूरकर यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वारंवार आवाहन करूनही काही नागरिक विना मास्क फिरत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. त्यामुळे नाईलाजास्त दंडात्मक कारवाई करावी लागत असल्याचेही श्याम मंदनूरकर यांनी सांगितले. शनिवार व रविवारी सर्वत्र लॉकडाऊन राहणार असून, या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार असून, दुकानदारांसह नागरिकांनी याची नाेंद घ्यावी तसेच कोणतीही विना मास्क फिरू नये व गर्दी करू नये, गर्दीत जाणे टाळावे व सर्व व्यवहार फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून करावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.
दरम्यान, या पथकाने शुक्रवारी (दि. २६) कामठी शहरातील विविध भागात फिरून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ७९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय, शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारही भरला नव्हता. उपविभागीय अधिकारी श्याम मंदनूरकर यांच्या नेतृत्वातील पथकात तहसीलदार अरविंद हिंगे, कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, कामठी(नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे यांच्यासह महसूल व पाेलीस विभाग आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता.