नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे फक्त मुस्लिमांबद्दल बोलले नाही, तर सर्व अल्पसंख्याकांबाबत बोलले. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायला भाजप समोर आली नाही तर भाजपचे मित्र (ओवेसी) समोर आले. यावरुन भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला.
खा. इम्रान प्रतापगडी गुरुवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वरोरा येथे जाऊन दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जगातील मोठी विद्यापीठे राहुल गांधी यांना सन्मानाने बोलावतात. त्यांचे भाषण ठेवतात. हा देशाचा अपमान आहे का? राहुल गांधी यांना जगात मिळणारा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. राहुल गांधी हिम्मतीने त्यांची मते मांडत आहेत, असे खा. प्रतापगडी म्हणाले. महाराष्ट्र सरकार काम करत नाही आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडे दुसरा पर्याय राहत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सरकारला नैतिकता नाही. राज्य सरकार काही काम करु शकत नाही. तर (अहमदनगर) नाव बदलत आहे. राज्य सरकारने नाव बदलण्यापेक्षा काम करायला हवे. हे सरकार काही दिवस टिकेल. आज निवडणूक झाली तर जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.