लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेची बोगी भाड्याने घेऊन किन्नरांचे नृत्य आणि जुगार खेळणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पवार यांच्यासह ६० लोकांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी पवार यांच्यासह शेखर शिरभाते, राहुल कोहळे आणि त्यांच्या ५० ते ६० जणांना आरोपी बनविले आहे. गुन्हा नोंदविल्याने पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ही घटना २० जानेवारीला घडली होती. लोकांना मेट्रोमध्ये जन्मदिवस साजरा करण्यासाठी बोगी भाड्याने देण्यात येते. पवार यांच्या सहकाऱ्याने एक बोगी भाड्याने घेतली होती. त्यांनी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनपासून लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला. यादरम्यान किन्नरांकडून नृत्य करवून घेण्यासह जुगार खेळण्यात आला. किन्नरांवर पैसे उधळण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मेट्रो प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली. त्यामुळे नागपूर शहर आणि मेट्रोची प्रतिमा खराब झाली होती. घटनेविरुद्ध मेट्रोचे व्यवस्थापक (नियंत्रक) ललित मीणा यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. व्हिडिओ क्लिपिंगच्या आधारावर सीताबर्डी पोलिसांनी भादंवि कलम २६८, २९४, १८६, १८८ आणि मेट्रो अधिनियम ५९, ६४ व जुगार विरोधक कायदा (१३)अंतर्गत गुन्हा नोंदविला. सध्या पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. पोलीस घटनेच्या व्हिडिओ क्लिपिंगची तपासणी करून पवार यांच्यासह प्रकरणात लिप्त अन्य लोकांचाही तपास करणार आहे.