भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:13 PM2019-09-15T15:13:21+5:302019-09-15T15:13:57+5:30
केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला.
नागपूर (खापरखेडा) : ‘जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू’अशी भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे कॉँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरुद्ध खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केदार यांच्यावर शनिवारी रात्री भांदविच्या कलम ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणाºया केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि खापरखेडा पोलिसांकडे केली होती. दरम्यान शनिवारी केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला. यासोबतच केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत पोतदार यांच्या नेतृत्वात गावात मोर्चा काढण्यात आला होता. केदार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती.
गुरुवारी सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात गोंधळ घालून भाजप कार्यकर्त्यांना केदार यांनी धमकावले होते. केदार यांचा धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याचे संतप्त पडसाद उमटले होते. भाजप कार्यकर्त्यांनी यावर टीका केली होती. खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.
भाजप शहराध्यक्ष तंबाखे विरुद्धही गुन्हा
स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात सरपंच प्रमीला बागडे यांच्या विरुद्ध भाषणात अश्लिल भाषेचा प्रयोग करणारे भाजपचे सिल्लेवाडा येथील शहराध्यक्ष आणि ग्राम पंचायत सदस्य अनिल तंबाखे यांच्यावरही खापरखेडा पोलिसांनी भांदविच्या कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तंबाखे यांनी भाषणात महिला सरंपचांचा अपमान केल्याचा आरोप बागडे यांनी केला होता.