लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एम्प्रेस मॉल सिटी परिसरातील विहिरीत गुदमरून मेलेल्या मजुरांचे मृतदेह मॉल परिसरात ठेवून गैरकायद्याची मंडळी जमविल्याप्रकरणी तसेच विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरांसह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. माजी महापौर प्रवीण दटके , नगरसेवक बंटी शेळके आणि रमेश पुणेकर यांचा गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.शनिवारी दुपारी एम्प्रेस मॉल परिसरातील विहिरीची साफसफाई करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दीपक गवते (वय २४, रा. सुगतनगर), चंद्रशेखर बारापात्रे (४०) आणि अजय गारुडी (वय ४३) या तिघांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला. संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तीन गरीब मजुरांचे बळी गेल्याने सर्वत्र प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, मृत मजुरांचे रविवारी सकाळी मेडिकलमध्ये विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. संतप्त कुटुंबीयांनी आणि विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह सरळ एम्प्रेस मॉलमध्ये आणून ठेवले. यावेळी जमावाने आक्रमक पवित्रा घेत जोरदार नारेबाजी केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. माजी महापौर प्रवीण दटके , नगरसेवक बंटी शेळके, रमेश पुणेकर, सुभाष ढबाले, नितीन मेश्राम, नितीन कानोरकर, सुरेश गोजे तसेच मोठ्या संख्येत नागरिक यावेळी होते. मृतांच्या कुटुंबीयांनात्वरित आर्थिक मोबदला द्या, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका जमावाचे नेतृत्व करणाऱ्यांनी घेतल्यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले. जमाव पोलिसांनाही जुमानत नव्हता. त्यानंतर कसेबसे वातावरण शांत झाले. या पार्श्वभूमीवर, गणेशपेठ पोलिसांनी उपरोक्त नेत्यांसह ६० ते ७० जणांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आता हे प्रकरण पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.---तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कारतणाव कमी होत नसल्याचे पाहून पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी मृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली. कायदेशीररीत्या लढाईत पोलीस सोबत असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी रात्री उशिरा तीनही मृतदेह घरी नेले. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या घाटांवर या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.---
नागपूरच्या माजी महापौरांसह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 9:22 PM
एम्प्रेस मॉल सिटी परिसरातील विहिरीत गुदमरून मेलेल्या मजुरांचे मृतदेह मॉल परिसरात ठेवून गैरकायद्याची मंडळी जमविल्याप्रकरणी तसेच विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरांसह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. माजी महापौर प्रवीण दटके , नगरसेवक बंटी शेळके आणि रमेश पुणेकर यांचा गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
ठळक मुद्देएम्प्रेस सिटी परिसरातील दुर्घटना : प्रकरण पेटण्याची शक्यता