लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल (एफआयआर) करून कडक कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात १५ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. यादरम्यान आवश्यक सेवा आणि खूपच आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर निघू शकणार नाही. जर कुणी याचे उल्लंघन करीत विनाकारण फिरताना आढळून आले तर त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी शहराच्या सीमा सील केल्या जातील. शहराच्या आतही ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाईल. आपात्कालीन व अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कुठलीही प्रतिष्ठाने उघडू दिली जाणार नाही. पोलिसांनी लॉकडाऊनसाठी सर्व स्तरावर तयारी केलेली आहे. यादरम्यान रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांना सूट राहील. त्याचप्रकारे कोरोना लसीसाठी बाहेर निघणाऱ्यांनाही त्रास होणार नाही. त्यांना रुग्णालयात येण्या-जाण्याची सूट राहील. नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेत विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.