मंगेश व्यवहारे, नागपूर: कॉटन मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले भाजी बाजाराला बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत बाजारातील ९ गाळ्यातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ लाख ८० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग इलेक्ट्रीकच्या शॉट सर्किटमुळे लागली. आगीत प्लॅस्टीकचे कॅरेट, एसी, पंखे व फर्निचर जळून खाक झाले. आगीमध्ये निलेश सोमकुवर, रवींद्र पाटील, अब्दुल/ रहमान जब्बार गरीब दलाल, प्रदीप गुमगावकर, नितीन पटे, दामू धावडे या गाळाधारकांचे नुकसान झाले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.
- कोरोनाच्या काळातही लागली होती आग
कोरोनाच्या काळातही महात्मा फुले मार्केटला भिषण आग लागून दुकाने जळाली होती. त्यातही गाळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. महात्मा फुले भाजी बाजाराचे अद्यावतीकरण करण्याची मागणी व्यापाऱ्यांची आहे. २००४ मध्ये येथील गाळेधारकांनी बाजार बनण्यासाठी महापालिकेला काही रक्कम सोपविली होती. त्याचा अद्यापही उपयोग करण्यात आला नाही. आगीच्या घटनामुळे आणि बाजाराची झालेली दुरावस्था बघून संबंधित विभागाने यापरिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी व लवकरच व्यापारी संकुल बनविण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी केली आहे.