नागपूर : लकडगंज परिसरातील भंडारा रोडवरील हरिहर मंदिर नजीकच्या आरा माशिनला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली असून सहा आरा मशिन जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास लकडगंजमधील लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. पाहता-पाहता आगीचे लोळ उठू लागले व तिने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत ६ आरा मशिन व ७-८ दुकाने जळून स्वाहा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, लाकडाचे गोडाऊन असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या घटनेत आसपासच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.