नागपूर : हॉस्पिटलमध्ये आग लागल्यास रुग्णांचा मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. नुकतेच दिल्ली येथील विवेक विहारमधील हॉस्पिटलला आग लागून सात नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्या अग्निशमन, आणिबाणी सेवा विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा रुग्णालय व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यास सुरुवात केली. या शिवाय, खासगी हॉस्पिटललाही ‘फायर ऑडिट’ करण्याचा सूचना दिल्या असून त्याची पाहणी केली जाणार आहे.
आरोग्य सेवा रुग्णालय, सहसंचालक मुंबई यांनी सर्व महापालिकेच्या अग्निसुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात रुग्णालयांच्या तपासणीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. ही चमू अग्निशमन विभागाच्या जवानांसोबत रुग्णालयांची तपासणी करीत आहे. या चमूमध्ये डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे व डॉ. सरला लाड यांचा समावेश आहे.
-मनपाच्या पाचपावली महिला रुग्णालयाचे लवकरच ऑडिटडॉ. सेलोकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मनपाच्या पाचपावली महिला रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यास अग्निशमन दलास सांगितले आहे. खासगी हॉस्पिटल आपल्या स्तरावर हे ऑडिट करतात. त्याचा अहवाल मनपाकडे सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. खासगी हॉस्पिटलच्या तपासणीला सुरूवातही झाली आहे.