नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ऑर्थाोपेडिक विभागाच्या वॉर्ड क्र. ३४ मध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. वॉर्डात २५ रुग्ण होते. संपूर्ण वॉर्ड धुराने भरला होता. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ‘शॉर्ट सर्कीट’मुळे आग लागल्याचे सांगण्यात येते.
प्राप्त माहितीनुसार, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ऑर्थाोपेडिक विभागाचा वॉर्ड क्र. ३४ आहे. वॉर्डाला लागूनच ड्रेसिंग रुम आहे. येथे रुग्णांना प्लास्टर लावले जाते. मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक या खोलीमधून दूर बाहेर येऊ लागला. वॉर्डातील डॉक्टर, परिचारिकांनी तातडीने सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली. खोलीमध्ये ठेवलेली गादी व वायर जळत होते. त्याचवेळी वॉर्डातील विद्युत पुरवठा खंडीत करून कर्मचाºयांनी अग्निशमन उपकरणाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. वॉर्डात धूर पसरल्याने थोड्यावेळेसाठी रुग्णसेवा विस्कळीत झाली होती.
वॉर्डात २५रुग्ण उपचाराखाली होते. परंतु कोणत्याही रुग्णाला कुठलाही त्रास झाला नसल्याचे सांगण्यात येते. अचानक लागलेल्या आगीने मात्र रुग्णांमध्ये भितीचे वातवरण पसरले. या पूर्वीही पेडियाड्रिक विभागातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात ‘शॉर्ट सक्रीट’ होऊन आग लागली होती. त्यावेळी कार्यरत परिचारिकेच्या तत्परतेने १० नवजात शिशूचे प्राण वाचले होते.