मायलेकांची मदतीसाठी वणवण : घरात खायला, अंथरायलाही काहीच उरले नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणुकीच्या काळात मतदारांना हात जोडून विनम्रपणे साद घालणारे नगरसेवक संकटात सापडलेल्या त्याच सामान्य मतदाराला कसे झिडकारतात याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. नारा रोडवरील कृष्णा नगरमध्ये भाड्याच्या एका खोलीत राहणाऱ्या मायलेकांचा संसार आगीत जळून खाक झाला. मदतीसाठी या मायलेकांनी भाजपाचे नगरसेवक विक्की कुकरेजा व सुषमा चौधरी यांच्याकडे तीन दिवस चकरा मारल्या. पण मदत तर सोडा पण त्यांच्या या व्यथेची माणुसकीच्या दृष्टीने साधी दखलही घेण्यात आली नाही. लंकेश पांडुरंग बंदराखे (वय २४) आई लक्ष्मीबाई व लहान भावासह कृष्णा नगर, नारा रोड, नुरी कॉलनी, मुस्लिम लायब्ररीच्या मागे एका १० बाय १० च्या खोलीत भाड्याने राहतो. ८ वी पास असलेला लंकेश गॅस सिलेंडर डिलिव्हरीच्या गाडीवर काम करतो. आई धुणीभांडी करते. महिनाभराच्या मिळकतीत ५०० रुपये घरभाडे देऊन उर्वरित पैशात उपजीविका भागवितात. रविवारी (४ जून ) सकाळी आई व दोन्ही मुले कामावर गेली असताना दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांच्या खोलीला आग लागली. शेजारच्या मंडळींनी धावाधाव करून आग विझविली. शेजारच्याने फोन करून त्यांना कळविले. कामावरून परतले तेव्हा घरातील सर्व सामान, अन्नधान्याची राखरांगोळी झाली होती. झोपायला चादरही उरलेली नव्हती. संसारच उद्ध्वस्त झाल्याचे पाहून लंकेशला आपण कराल का मदत? मायलेकांच्या घरात कुठलेही सामान उरलेले नाही. सध्या हे कुटुंब अंगणात उघड्या छताखाली राहत आहे. अन्नापासून ते अंथरुणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. समाजात सहृदय दात्यांची कमतरता नाही. दातृत्वशील लोक मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतात. आपण असाच मदतीसाठी एक हात पुढे केला तर लंकेशचा राख झालेला संसार पुन्हा सुरळीत होऊ शकतो. आपण नक्कीच मदत कराल, याची ‘लोकमत’ला खात्री आहे. संपर्क : मो. ८१८०८०९६३६
आगीत घर जळाले, नगरसेवकानेही झिडकारले
By admin | Published: June 08, 2017 2:45 AM