लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या रासायनिक खताच्या कंपनीला शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत आतील साहित्य व रसायन जळाल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी कंपनीत कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.कळमेश्वर एमआयडीसी परिसरात अंकुश इंडस्ट्रीज नामक रासायनिक खते तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीत दाणेदार खतांसाेबतच लिक्विड फर्टिलायझरचे उत्पादन केले जाते. त्यामुळे ही उत्पादने तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा साठाही कंपनीत हाेता. दिवसभराचे काम आटाेपल्यानंतर कंपनीतील कामगार घरी निघून गेल्याने आत कुणीही नव्हते.
दरम्यान, सायंकाळी कंपनीतून माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे सुरक्षारक्षकांसह परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. आत आग लागल्याचे स्पष्ट हाेताच सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली तर शेजारच्या कंपन्यांमधील कामगारांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यातच कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व पाण्याचे चार टँकर वेळीच घटनास्थळी दाखल झाले.आग विझविण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते. आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशमन दलाचे जवान आवश्यक ती काळजी घेत उपाययाेजना करीत हाेते. या आगीत इमारतीतील बहुतांश रसायन व साहित्य जळाले. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही.