प्राणहानी टळली : अंदाजे दीड कोटींचे नुकसानधामणा : नागपूर - अमरावती महामार्गावरील गोंडखैरी शिवारात असलेल्या ‘कमर्शियल एक्स्प्लोसिव्ह’ नामक कंपनीच्या १९ क्रमांकाच्या प्लान्टमध्ये सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आग लागली. यात प्लान्टमधील २३ मशीन आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्या असून, एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली. कामगारांच्या प्रसंगावधानामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. गोंडखैरी शिवारात ‘कमर्शियल एक्स्प्लोसिव्ह’ नामक कंपनी आहे. या कंपनीच्या प्लान्ट क्रमांक - १९ मध्ये डांबर वितळविण्याच्या मशीन लावण्यात आल्या आहेत. यातील एका मशीनच्या हिटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडली आणि मशीनने पेट घेतला. आग हळूहळू उग्र रूप धारण केले. कामावर असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान बाळगत प्लान्टमधून बाहेर सुरक्षितस्थळी जायला सुरुवात केली. त्यामुळे या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करीत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत प्लान्टमधील २३ मशीन जळाल्या होत्या. यात १ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर राजाराम सोहनी व प्रॉडक्शन मॅनेजर खुर्शीद यांनी दिली. (वार्ताहर)
‘कमर्शियल एक्स्प्लोसिव्ह’मध्ये आग
By admin | Published: March 07, 2017 2:03 AM