अग्निशमन सेवा दिन : कोविड संक्रमणामुळे शासनाच्या निर्देशानुसार कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षभरात आगीच्या ७८९ घटना घडल्या. यात ५१२ लहान, १६२ मध्यम व ११५ मोठ्या आगीचा समावेश होता. महापालिकेच्या अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा अभाव असूनही विभागाच्या जवानांनी १३९ कोटी ६८ लाख ४ हजार २६० रुपयांची मालमत्ता आगीपासून वाचविली आहे. आगीत १३ कोटी २६ लाख ९१ हजार ८०६ रुपयांचे नुकसान झाले. दरवर्षीे १४ ते २० एप्रिल या कालावधीत देशात अग्निशमन सेवा सप्ताह तर १४ एप्रिल अग्निशमन सेवा दिन साजरा केला जातो. कोविड संक्रमणामुळे अग्निशमन विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक अंतर पाळून आज बुधवारी मनपा हिरवळीवर महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत विभागातील शहिदांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात येणार आहे.
आगीच्या घटनांव्यतिरिक्त इतर आपात्कालीन ६९३ घटनांची सूचना विभागाला प्राप्त झाली. त्यामध्ये विहीर व तलाव, नदी व गडर अशा २६९ घटनांचा समावेश आहे. त्यात जखमी ३० तर ८४ जणांना मृतावस्थेत काढण्यात आले. विभागाने शहराबाहेर ६४ आगीच्या वर्दीवर अग्निशमनाचे कार्य केले आहे. यात ५० कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश आले. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षभरात ६६ उपक्रम राबविण्यात आले.
...
३,७७० विहिरींची स्वच्छता
आग नियंत्रणासोबतच अग्निशमन विभागाचे मूळ कार्य नसताना शहरातील ३,७७० दूषित विहिरीचा उपसा करण्यात आला. त्यामध्ये ७२ विहिरीचा शुल्क आकारून उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार लावलेला आहे. कोविड काळात प्रतिबंधित क्षेत्रात अग्निशमन विभागाच्या वाहनाद्वारे फवारणीचे कार्य करण्यात आले.
...
२.३० कोटी उत्पन्न
वर्षभरात इमारत तथा व्यवसायाकरिता नाहरकत प्रमाणपत्राद्वारे, अग्निशमन सेवाशुल्क, निरीक्षण शुल्काद्वारे पाणीपुरवठा, विहीर उपसा तसेच मनपा हद्दीबाहेर पुरविण्यात आलेल्या अग्निशमन सेवामार्फत २ कोटी ३० लाख ९५१ रुपयांचा महसूल जमा केला.
...
भविष्यातील नियोजन
- विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षेकरिता अग्निरोधक फायरसूट खरेदी करण्यात येणार आहे.
- शहरातील अरुंद रस्त्यातील आगीच्या दुर्घटनांवर कार्य करण्यास ३२ मीटर हायड्रोलिक प्लॅटफार्म खरेदी करणार.
- वाठोडा परिसरात अग्निशमन केंद्र उभारणार
- कळमना अग्निशमन केंद्रातील अतिरिक्त जागेवर जलतरण केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे.
..