नागपूर: आगीसारख्या दुर्घटनांपासून रेल्वे गाड्यांचे संरक्षण करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, २०२३-२४ मध्ये ११ पॉवर कारमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. या सिस्टममुळे आगीचा धोका टाळणे शक्य होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांमध्ये आग लागून मोठी हानी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांमधून ज्वलनशील पदार्थ आणि साहित्याची वाहतूक करण्यावर बंदी घातली असून, त्याला न जुमानणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा पवित्राही घेतला आहे.
तरीसुद्धा अनेक जण लपून छपून गाड्यांमधून ज्वलनशील पदार्थांची आणि सिलिंडर तसेच अन्य साहित्याची वाहतूक करतात. ते लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता रेल्वे गाड्यांना आगीच्या घटनांपासून संरक्षण देण्यासाठी फायर डिटेक्शन ॲन्ड सप्रेशन सिस्टीम कार्यान्वित केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत एकूण १४३ पॉवर कार्सना फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम लावण्यात आली आहे. गाड्यांचे डबे आणि आईसीएफ पॉवर कार्समध्ये नमूद फायर सेफ्टी सिस्टीम बसवण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, डिसेंबर-२०२३ पर्यंत ५०० वातानुकूलित डब्यांमध्ये धूर शोधण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय सर्व नॉन-एसी कोचमध्ये अग्निशामक उपकरणे लावण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे गाड्यांचे सुरक्षित संचलन करण्यास मदत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.