लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी मंगळवारी येथील घास बाजार परिसरातील वाहनांना लागलेली आग विझवण्यासाठी उशिरा पोहचलेल्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संतप्त जमावाने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.घास बाजार परिसरातील वाहनांना आग लागण्याची फोनवरून माहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. गाडी सेंट्रल एव्हेन्यू मार्गे घटनास्थळी रवाना करण्यात आली. परंतु चंद्रहास बारजवळ मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. येथे लोखंडी सळाखी व रॉड बाहेर निघालेले आहेत. त्यामुळे गाडी पुढे नेता येत नव्हती. अखेर गाडी आदमशहा चौकातून घटनास्थळी पोहचली. यामुळे गाडी उशिरा पोहचली. वेळीच गाडी न आल्याने उपस्थितात रोष होता. त्यामुळे गाडी येताच लोकांनी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. जमाव अधिक आक्रमक झाला व त्यांनी कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.यात फायरमन प्रवीण झाडे, दसाहस्त्रे, चालक नागसर, प्रेशर बॉय पेंदाम व दोन प्रशिक्षणार्थी आदींचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली होती. त्यामुळे घटनास्थळी पोलीसही पोहचले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याचे पाहून पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. रात्री उशिरापर्यत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास गाडी परत आल्याची माहिती लकडगंज अग्निशमन स्टेशनचे प्रमुख मोहन गुडधे यांनी सांगितले. गाडी आल्याने लोकांनी मारहाण केल्याची माहिती आहे. परंतु याला कर्मचारी दोषी नसल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भात लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आल्याचे माहिती प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे यांनी दिली.
नागपुरात संतप्त जमावाची अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:25 AM
जुनी मंगळवारी येथील घास बाजार परिसरातील वाहनांना लागलेली आग विझवण्यासाठी उशिरा पोहचलेल्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संतप्त जमावाने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.
ठळक मुद्देआग विझवण्यासाठी गाडी विलंबाने पोहचल्याचा नागरिकांचा आरोप