तान्हुल्याचे बळी घेणाऱ्या अन् जन्मदात्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आगीचे कारण शोधणार
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा जन्मदात्यांच्या काळजाचे तुकडे हिरावून त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करून सोडणाऱ्या भंडारा सामान्य रुग्णालयाच्या आगीमागचे कारण शोधण्यासाठी मुंबईहून फायर फॉरेन्सिकची टीम निघाली आहे. मंगळवारी ही टीम भंडाऱ्यात पोहचणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. १० तान्हुल्यांचे बळी घेणाऱ्या या आगीच्या घटनेला ७० तासांचा कालावधी झालेला आहे. ही आग अशी लागली, तशी लागली असे नुसतेच तर्क सांगितले जात आहेत. या आगीने धूर निर्माण झाला अन् चिमुकले गुदमरून मेले, होरपळून मेले, असे सांगितले जात आहे. मात्र, हे केवळ तर्क आहेत. आग नेमकी कशी लागली, त्यामुळे शिशू केअर युनिटमध्ये काय स्थिती निर्माण झाली असेल त्याची सूक्ष्म तपासणी फायर फॉरेन्सिकची टीम करणार आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे फायर, इलेक्ट्रिक आणि पीडब्ल्यूडीच्या कामाशी संबंधित तज्ज्ञांचा या टीममध्ये समावेश असून चार अधिकारी आणि सुमारे अर्धा डझन मदतनीस यात असतील. मंगळवारी सकाळी ही टीम भंडाऱ्यात पोहचेल. घटनास्थळाची पाहणी करून तेथील सॅम्पल ताब्यात घऊन त्याचा अभ्यास केल्यानंतर ही टीम आपला अहवाल सादर करेल.
---
हा अपघात आहे...?
विशेष म्हणजे, अवघ्या महाराष्ट्राला या घटनेने सुन्न करून सोडले आहे. प्रशासनात खळबळ उडाली असली तरी ती केवळ कागदोपत्रांपुरतीच मर्यादित राहणार की काय, असा संशय घेतला जात आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी यावर खुलेपणाने बोलण्याचे टाळले आहे. प्रशासनाच्या मते, हा अपघात आहे. १० जन्मदात्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी करणाऱ्या या अपघाताला तीन दिवस झाले. तरी केवळ कागदोपत्रीच घोडे नाचवले जात आहेत. अद्याप कुणाला दोष देण्यात आला नसून कुणाचे निलंबनही करण्यात आलेले नाही.
---