लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माणाधीन गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील इंडियन सफारी क्षेत्रात गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत काटोल रोडवरील उजव्या बाजुकडील जंगलातील १०० हेक्टर क्षेत्र जळाले. या आगीत जंगलीत उंच गवतासह लहान झाडे पूर्णत: जळाली. वन अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच आग विझवण्यासाठी तत्परता दाखवली नसती तर आग जंगलात आणखी पसरली असती. एखाद्याने जाणीपूर्वक ही आग लावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार दुपारी अचानक जंगलात आग लागली. ही आग पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे वाढत होती. याच भागात इंडियन सफारी आणि इतर प्रशासकीय इमारतींचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्याही होत्या. दुपारी ३ वाजता गेटपासूनच आग समोर वाढत असल्याचे दिसून आले. आग लागल्याचे लक्षात येताच वन अधिकाऱ्यांनी इमारतींच्या बांधकामासाठी आणलेल्या टँकरच्या पाण्याने आग विझवण्याला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांनी मजुरांच्या झोपडयांकडे पसरणारी आग विझवण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांपासून तर मजुरांपर्यंत सर्वच जण आग विझवण्यासाठी पुढे आले. दरम्यान अग्नीशमन दलालाही सूचना देण्यात आली होती. अग्नीशमन दलाची एक गाडीही घटनास्थळी पोहोचली. अखेर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जंगलातील संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. गोरेवाडाचे डीएफओ नंदकिशोर काळे, एसीएफ मारभृषी, आरएफओ सुनील सोनटक्केसह सर्व वन कर्मचारी आग विझवण्यासाठी अग्रेसर होते.दोन दिवसांपूर्वीही लागली होती आगसूत्रानुसार दोन दिवसांपूर्वी सुद्धा गोरेवाडा जंगलातील रेस्कू सेंटर परिसरात आग लागली होती. परंतु वेळीच लक्ष गेल्याने ती आग विझवण्यात आली.