अंबाझरी वनासाठी अग्निसुरक्षा आराखडा तयार : सरकारची हायकोर्टाला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 08:41 PM2019-07-25T20:41:10+5:302019-07-25T20:42:12+5:30

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे.

Fire Protection Plan ready for Ambazari Forest | अंबाझरी वनासाठी अग्निसुरक्षा आराखडा तयार : सरकारची हायकोर्टाला माहिती

अंबाझरी वनासाठी अग्निसुरक्षा आराखडा तयार : सरकारची हायकोर्टाला माहिती

Next
ठळक मुद्देसंयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे.
राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. समितीच्या बैठकीचे इतिवृत्त ७ ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर केले जाणार आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने अंबाझरी वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी विचारणा राज्य सरकारला केली होती. त्यानंतर सरकारने सुरक्षा आराखडा तयार केला.
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी व वाडीपर्यंत वन विभागाची सुमारे दोन हजार एकर जमीन आहे. या परिसरात नैसर्गिकरीत्या हजारो झाडे वाढली होती. तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, गेल्या मे महिन्यामध्ये मध्यरात्री या वनाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाने रात्री २ वाजता घटनास्थळी पोहचून पहाटे ५ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले, पण तेव्हापर्यंत बराच विलंब झाला होता. दरम्यान,आगीमुळे हजारो झाडे जळून खाक झाली. याविषयी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेत सरकारला वन संरक्षणाकरिता आवश्यक निर्देश दिले जात आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Fire Protection Plan ready for Ambazari Forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.