नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात असलेल्या ‘रेकॉर्ड रूम’ला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात एकच धावपळ झाली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यांच्या मदतीने एका तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात रेल्वे रिझर्व्हेशनबाबतचे दस्तावेज आगीत भस्मसात झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी एक इमारत आहे. या इमारतीच्या तळमाळ्यावर मुख्य आरक्षण पर्यवेक्षक कार्यालयाची ‘पीआरएस रेकॉर्ड रूम’ आहे. या रूममधून सकाळी ८.४५ वाजताच्या दरम्यान धूर निघताना दिसला. परिसरातील नागरिकांनी त्वरित याची सूचना लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला दिली. आरपीएफने नियंत्रण कक्षाला कळविले. महापालिकेच्या अग्निशमन विभागास याची सूचना देण्यात आली. परंतु अग्निशमन विभागाच्या गाड्या येईपर्यंत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेकॉर्ड रूमच्या काचा फोडल्या. नळ सुरू करून रेकॉर्ड रूममध्ये पाणी सोडले. तेवढ्यात कस्तुरचंद पार्कवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेसाठी तैनात एक अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. काही वेळाने दुसरी गाडीही आली. दोन्ही गाड्यांतून पाण्याचा मारा करून एक तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते आग शॉट सर्किटमुळे लागली. परंतु रेल्वे प्रशासन यावर काहीच बोलण्यास तयार नाही. या घटनेपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफॉर्म परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक आग लागली होती. याशिवाय बल्लारशा रेल्वेस्थानकावर इंधन नेणाऱ्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली होती. या घटनांनंतरही रेल्वेस्थानकावर आग विझविण्याची सुविधा उपलब्ध न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आगीच्या कारणाचा शोध घेणार४मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी आग कशामुळे लागली याचे कारण माहिती नसल्याचे सांगितले. सकाळी रेकॉर्ड रूममधून धूर निघत होता. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत काही दस्तावेज जळाले आहे. आग कशामुळे लागली याचा तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या ‘रेकॉर्ड रूम’मध्ये आग
By admin | Published: April 12, 2016 5:24 AM