भिवापूर : शाॅर्ट सर्किट झाल्याने दाेन घरांना आग लागली. त्यात दुचाकी, कूलर, टीव्ही संच तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूंची राखरांगाेळी झाल्याने दाेन्ही कुटुंबीयांचे माेठे नुकसान झाले. ही घटना तालुक्यातील वडध येथे मंगळवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास घडली.
वडध येथील शांताबाई राजेराम बोबडे व बंडू कावळे यांची घरे जवळजवळ आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घरावरून गेलेल्या जिवंत विद्युत तारांवर शाॅर्ट सर्किट उडाले. अशातच घरावर ठिणगी पडल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आगीने राैद्र रूप धारण केल्याने दोन्ही घरातील साहित्य जळून खाक झाले. प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे इतर घरे आगीच्या तावडीत सापडण्यापासून थाेडक्यात बचावली. या घटनेत दोन्ही कुटुंबीयांचे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. नुकसानग्रस्त दोन्ही कुटुंबांना शासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.