नरेश डोंगरे
नागपूर : शनिवारी सकाळी नवी आमला - नागपूर मार्गाने धावणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेसमधून धूर निघत असल्याचे दिसल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यानंतर आमला - नागपूर मार्गावर तांत्रिक चमूने तांत्रिक बिघाड दूर केला. हा ब्रेक बाईंडिंगचा प्रकार असल्याचे कळाल्यानंतर प्रवाशांसह साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.
ट्रेन नंबर १२७२४ नवी दिल्ली - हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेस नेहमीप्रमाणे आमला नागपूर मार्गावर धावत होती. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ट्रेनच्या पँट्री कारमधून धूर निघू लागला. ते पाहून प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. धावत्या ट्रेनला आग लागली की काय, अशी शंका घेऊन प्रवाशांचे तर्क वितर्क सुरू झाले. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
पांढूर्णा - दरिमेटा विभागात ट्रेन थांबवून रेल्वेच्या तांत्रिक चमूने पाहणी केली. पँट्री कारमध्ये ब्रेक बाईंडिंग झाल्यामुळे धूर निघत असल्याचे उघड झाल्यानंतर तो दोष दूर करण्यात आला. यामुळे सुमारे अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा झाला. दुरूस्ती केल्यानंतर १०. ३० वाजता ट्रेन पुढे मार्गस्थ करण्यात आली. दरम्यान, हा आगीचा प्रकार नव्हे तर पँट्री कारमध्ये झालेल्या ब्रेक बाईंडिंगचा प्रकार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काय असते ब्रेक बाईंडिंग
रेल्वेच्या चाकांना जे ब्रेक असतात ते सारखे दाबले गेल्यामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे एखाद्या कोच खालच्या चाकांना घट्ट चिपकतात. ब्रेक चिपकल्यामुळे त्या चाकातून धूर निघत असतो. त्याला ब्रेक बाइंडिंग म्हणतात. प्रवाशांना त्याची माहिती नसल्यामुळे धूर निघत असल्याचे पाहून ते आग लागली असावी, असा गैरसमज करून घाबरतात. मात्र, ब्रेक बाइंडिंगमुळे आग लागत नाही. रेल्वे विभाग याला तांत्रिक दोष मानतो.