लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : हिंगणा एमआयडीसी परिसरातील साैंदर्य प्रसाधने, दंतमंजन व टुथपेस्टचे उत्पादन करणाऱ्या विको लेबाॅरेटरीज कंपनीला रविवारी (दि. ७) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आग आली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले हाेते. आग विझविण्याचे कार्य साेमवारी (दि. ८) दुपारपर्यंत सुरूच हाेते. मशीन, कच्चा व पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. रात्रीला काम बंद असल्याने सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
हिंगणा औद्याेगिक वसाहतीत प्लाॅट क्रमांक एस-८९ मधील चार एकर जागेवर विको लेबाॅरेटरीज कंपनी विस्तारली आहे. या कंपनीमध्ये विविध साैंदर्य प्रसाधने, दंतमंजन व टुथपेस्टचे उत्पादन केले जाते. कंपनी व्यवस्थापनाने रात्रपाळीतील कामे बंद केल्याने कंपनीच्या आवारात सुरक्षा रक्षकांसह कुणीही नव्हते. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कंपनीच्या मागच्या भागाला असलेल्या याच कंपनीच्या गाेदामातून माेठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाली. धूर व आगीचे लाेळ दिसताच सुरक्षा रक्षकांनी कंंपनी व्यवस्थापनासाेबतच एमआयडीसी पाेलीस व अग्निशमन दलाला माहिती दिली.
आगीचे उग्र रूप पाहता ती नियंत्रणात आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने हिंगणा एमआयडीसीतील दाेन, नागपूर महानगरपालिकेच्या सहा, वाडी नगर परिषदेच्या दाेन तर कळमेश्वर व बुटीबाेरी नगरपालिकेच्या प्रत्येकी एक अशा एकूण १२ गाड्या बाेलाविण्यात आल्या. आग विझविण्याचे कार्य रात्रभर सुरूच हाेते. सकाळी गाेदामातील संपूर्ण साहित्याची राख झाली व ही आग लगेच्या दुसऱ्या इमारतीत पसरली. या आगीत कंपनीतील मशीनरी, पक्का माल, महागडी साैंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळून राख झाली.
या आगीचे कारण व त्यात झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र, नुकसान काेट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शिवाय, कंपनी व्यवस्थापनाने याबाबत साेमवारी सायंकाळपर्यंत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली नव्हती, अशी माहिती ठाणेदार युवराज हांडे यांनी दिली.
...
उद्याेगांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दाेन महिन्यात हिंगणा एमआयडीसीतील आगीची ही दुसरी माेठी घटना हाेय. उद्याेगांना लागणाऱ्या भीषण आगींमुळे एमआयडीसीतील उद्याेगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये याच एमआयडीसीतील स्पेसवूड नामक कंपनीला आग आगली हाेती. या आगीत कंपनीतील लाकडाचे संपूर्ण साहित्य जळाले हाेते. ती आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दाेन दिवस लागले हाेते. अधूनमधून घडणाऱ्या या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययाेजना करणे व काळजी घेणे गरजेचे आहे.